नागपुरात घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल; २.५० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत, मुख्य आरोपी फरार

    20-Jul-2026
Total Views |
 
house-breaking cases
 Image Source:(Internet)
 
नागपूर : नागपूर (Nagpur) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करत सुमारे २.५० लाख रुपये किमतीचे २३.१० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल विक्रीस मदत करणाऱ्या एका व्यक्तीसह तो खरेदी करणाऱ्या सराफा व्यावसायिकाचा तपासात सहभाग समोर आला आहे. मात्र, मुख्य आरोपी हर्ष उर्फ एक्का महेंद्र रामटेके हा अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.
 
राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे येथील प्रीती मंगेश काटेकर यांनी तक्रार दिली होती. २१ ते २२ मे २०२६ या कालावधीत त्यांच्या नागपूरमधील भाड्याच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले होते.
 
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ही चोरी हर्ष उर्फ एक्का रामटेके याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याने चोरीतील दागिने अर्जुन प्रभू सोलंकी (रा. आराधना नगर, भांडेवाडी) याच्यामार्फत विक्रीसाठी दिल्याचे उघड झाले.
 
अर्जुन सोलंकीची चौकशी केली असता, त्याने हे दागिने उमरेड येथील इतवारी पेठेतील आशीर्वाद ज्वेलर्सचे संचालक संदीप भास्कर गुरुलवार यांना विकल्याची माहिती पोलिसांना दिली.
 
दरम्यान, तपासात आणखी एका घरफोडीचा छडा लागला. २९ जून २०२६ रोजी सिंधी कॉलनी, खामला येथे झालेल्या घरफोडीतील सोन्याचे ब्रेसलेट आणि इतर दागिनेही हर्ष रामटेकेने अर्जुनच्या माध्यमातून त्याच सराफा व्यावसायिकाला विकल्याचे उघडकीस आले.
 
या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दोन्ही गुन्ह्यांतील २३.१० ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे २.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
अनेक गुन्ह्यांतील सराईत आरोपी
तपासात हर्ष उर्फ एक्का महेंद्र रामटेके हा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील रहिवासी असून तो सराईत घरफोड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपुरात येऊन ओयो हॉटेलमध्ये मुक्काम करत विविध भागांतील बंद घरे हेरून तो चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरुद्ध नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.
 
मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेची विशेष पथके विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत.
 
ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, संयुक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, सहाय्यक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे आणि गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने केली.