संसदेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तणाव; 'चलो संसद' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कडेकोट

    20-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. NEET पेपर लीक प्रकरण, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा या मागण्यांसाठी विद्यार्थी आणि CJP कार्यकर्त्यांनी दिलेल्या 'चलो संसद' आंदोलनामुळे संसद परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

आंदोलनाचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन संसद भवन आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

विद्यार्थ्यांचा सरकारवर दबाव-
NEET पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. संसदेकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमल्याने प्रशासनाने सतर्क भूमिका घेतली.

चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न-
आंदोलन चिघळू नये यासाठी केंद्र सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. CJP चे प्रतिनिधी सौरव दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दिल्लीत कडेकोट बंदोबस्त-
संसद परिसराकडे जाणारे अनेक मार्ग बंद करण्यात आले असून, विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी हलका लाठीचार्ज तसेच अश्रुधुराचाही वापर करण्यात आल्याची माहिती आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवरही तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत.