NEET पेपर लीकप्रकरणी नागपुरात विद्यार्थ्यांचा संताप; संविधान चौकात जोरदार आंदोलन

    20-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)
नागपूर : देशभर गाजत असलेल्या नीट (NEET) पेपर लीकप्रकरणाचे पडसाद नागपुरातही उमटले. परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि पारदर्शकतेच्या अभावाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सोमवारी संविधान चौकात जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या प्रक्रियेतील कथित निष्काळजीपणा, सुरक्षेतील त्रुटी आणि पेपर लीकसारख्या गंभीर घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची गरज असल्याचे आंदोलकांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

संविधान चौक परिसरात आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडले असून विद्यार्थ्यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला.