Image Source:(Internet)
जालना : भाजप (BJP) आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर कारला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर जामखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारायण कुचे हे सहकाऱ्यांसह आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जात होते. जामखेड शिवारातील वाकाणाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर रस्त्याच्या खाली जाऊन उलटली.
अपघाताच्या वेळी आमदार नारायण कुचे हे त्या वाहनात नव्हते. ते दुसऱ्या गाडीतून प्रवास करत असल्याने ते सुरक्षित राहिले. घटना समजताच त्यांनी तातडीने वाहन थांबवून अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
या अपघातात जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.