परवानगी नसतानाही आज संसदेकडे 'कॉक्रोच'चा मोर्चा; पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत सुरक्षा कडक

    20-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : केंद्रीय परीक्षांमधील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखाली आज संसदेकडे मोर्चा निघणार आहे. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन मागे घेण्यास नकार देण्यात आल्याने राजधानीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व करण्यात आली आहे.

संसद मार्ग, जंतरमंतर आणि सफदरजंग रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील भागांत जमावबंदी लागू करण्यात आली असून आंदोलकांना रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

'नीट'सह विविध केंद्रीय परीक्षांतील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांनी लावून धरली आहे. देशभरातील विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल होत असून जंतरमंतर परिसरात गर्दी वाढू लागली आहे.

दरम्यान, उपोषणावर असलेले सोनम वांगचुक यांना प्रकृती बिघडल्याने सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याची मागणी त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. मात्र, वैद्यकीय उपचार योग्य पद्धतीने सुरू असल्याचे नमूद करत न्यायालयाने ही मागणी फेटाळली.

गीतांजली आंगमो यांनी सांगितले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि उत्तरदायित्वाचा प्रश्न गांभीर्याने मांडण्याचे आश्वासन मिळाल्यास सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार आहेत.

रुग्णालयातून देशवासीयांना लिहिलेल्या पत्रात सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला "स्वातंत्र्यानंतरची आणखी एक निर्णायक लढाई" असे संबोधत नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. न्याय्य, पारदर्शक आणि विद्यार्थीहिताचे शिक्षण व्यवस्थेसाठी संघर्ष सुरू ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.