
Image Source:(Internet)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला अलीकडच्या काळात मोठे राजकीय धक्के बसत असताना आता आणखी एका संभाव्य पक्षप्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. मात्र, या चर्चांवर त्यांनी स्वतःच स्पष्टीकरण देत अफवांना पूर्णविराम दिला आहे.
शुभांगी पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. "ज्या दिवशी पक्षप्रवेशाचा निर्णय घेईन, त्या दिवशी तो सर्वांना सांगूनच घेईन. सध्या कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळे पक्षप्रवेशाचा प्रश्नच उद्भवत नाही," असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आपण राज्यभर काम करत असल्याचे सांगत, शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा पक्ष असेल तरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, याचवेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. "उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ देत नाहीत, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये आहे. या नाराजीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे," असे वक्तव्य त्यांनी केले.
अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता आमदार आणि मुंबई महापालिकेतील काही माजी नगरसेवकही संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली होती.
सध्या तरी शुभांगी पाटील यांनी पक्षांतराच्या चर्चांचे खंडन केले असले, तरी नेतृत्वाबाबत व्यक्त केलेली नाराजी भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाची मानली जात आहे.