
Image Source:(Internet)
अयोध्या : राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, २०२५ च्या महाकुंभ कालावधीत मंदिरात विक्रमी देणगी जमा झाली असताना त्याच काळात सर्वाधिक रकमेचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथकाला (एसआयटी) आणखी १५ दिवसांचा अवधी दिला आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा हे नात्याने मेहुणे असून, देणगीतील मोठी रक्कम बेकायदेशीररीत्या वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची पद्धत आणि त्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रणा याबाबत महत्त्वाची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात असे समोर आले आहे की, आरोपींना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे स्थान आणि त्यांच्या कक्षेबाहेरील जागांची पूर्ण माहिती होती. याचाच फायदा घेत देणगी मोजणीदरम्यान रोकड लपवली जात होती. सुरुवातीला पैसे मंदिर परिसरातील स्वच्छतागृहात ठेवले जात आणि योग्य संधी साधून ते बाहेर काढले जात असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. चोरी करताना इतर कर्मचारी भोवती उभे राहून कॅमेऱ्यांचे दृश्य झाकत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
महाकुंभ काळात देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाल्याने मंदिरातील देणगीत मोठी वाढ झाली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपींनी संगनमताने कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. तपासात चोरीच्या पैशातून सहापेक्षा अधिक मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकरणातील आरोपी टिन्नू यादवकडे देणगी मोजणी कक्षाची किल्ली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांच्या वाहनाचा चालक होता. त्याच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी अविनाश शुक्लाच्या भावाच्या योग केंद्रावर टाकलेल्या छाप्यात चार पेट्यांमधून मोठी रोकड हस्तगत करण्यात आली. एका पेटीवर 'राम राज्य कोष' असे लिहिलेले असून त्यावर डिजिटल व्यवहारासाठी क्यूआर कोडही आढळला आहे. या आर्थिक व्यवहारांचाही तपास एसआयटीकडून सुरू आहे.