
Image Source:(Internet)
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. साकीनाका परिसरात मोबाईलवर बोलत रस्त्याने जात असलेल्या एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ही घटना साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती मोबाईलवर बोलत चालत असताना रस्त्यावरील उघडा मॅनहोल त्याच्या लक्षात आला नाही. क्षणार्धात तो सुमारे २० ते २५ फूट खोल मॅनहोलमध्ये कोसळला आणि पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची चप्पल आणि छत्री घटनास्थळी आढळून आली. मात्र, गटारातील पाण्याचा वेग जास्त असल्याने बचावकार्य मोठ्या अडचणीचे ठरले.
यानंतर स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृत व्यक्तीची ओळख अन्सारी अशी पटली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथे खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू होती. त्यामुळे मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. याच निष्काळजीपणामुळे हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप केला जात आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पावसाळी कामांची आणि नाल्यांची पाहणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवाची सुरक्षितता धोक्यात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे उघडे मॅनहोल, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि पावसाळ्यातील नियोजनावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.