
Image Source:(Internet)
पुणे : लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल यांना दरीत ढकलून हत्या केल्याप्रकरणी तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेली केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत.
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी सिया गोयलला तिच्या घरी नेऊन पंचनामा केला. यावेळी तिचा मोबाईल, घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडे आणि इतर महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. १८ जून रोजी घटना घडल्यानंतर सियाने कोणते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. जप्त केलेले कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
'एरिया 37' परिसरात हत्या करण्याचा सराव केल्याचा संशय-
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, पुण्यातील एरिया 37 परिसराच्या मागील टेकडीवर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला किल्ल्यावरून कसे ढकलायचे याचा सराव केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सियाला घेऊन पुण्यातील विविध ठिकाणी भेट देत पंचनामा केला. घटनेपूर्वी आणि घटनेनंतर ती ज्या ठिकाणी गेली होती, त्या सर्व ठिकाणांची तपासणी करण्यात आली. तसेच सराव केल्याचा संशय असलेल्या टेकडीचीही पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले.
तपास अधिक गतीने-
या हत्येतील कट, नियोजन आणि दोन्ही आरोपींची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळांसह संबंधित ठिकाणांचे पंचनामे, जप्त साहित्याची फॉरेन्सिक तपासणी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला जात असून, या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.