सहयोगी सदस्य म्हणून करणार काम

Image Source:(Internet)
मुंबई : राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या पक्षांतराच्या घडामोडींमध्ये शिवसेनेने आणखी एक महत्त्वाची भर घातली आहे. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. ते पुढे शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत.
शिवसेनेच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांच्या निर्णयाचे स्वागत केले. राज्यातील विकासकामे, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सरकारची भूमिका आणि शिवसेनेची कार्यपद्धती पाहून त्यांनी सहयोगी सदस्य म्हणून पक्षासोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शिंदे म्हणाले की, शिवसेना दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे. महायुती सरकार शिक्षकांसह विविध घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सरनाईक यांनी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारसोबत समन्वयाने काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, किरण सरनाईक यांनीही आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. राज्यातील विकासकामे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीमुळे आपण प्रभावित झालो असून, शिक्षकांच्या हितासाठी सरकारसोबत राहून काम करण्याच्या उद्देशाने शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत शिवसेनेकडे विविध पक्षांतील लोकप्रतिनिधींचा ओढा वाढताना दिसत असून, सहा खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही साथ दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.