उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना चांगलंच सुनावलं; बच्चू कडूंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

    02-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) मधील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि शिंदे गटाचे समर्थक बच्चू कडू यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच सुनावल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

शिवसेना (ठाकरे गट) मधील काही खासदारांच्या पक्षांतरानंतर माजी मंत्री सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बोलताना बच्चू कडू यांनी ठाकरे गटावर आणि विशेषतः संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

"सचिन अहिर आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांची टीमही येईल, असा आम्हाला विश्वास आहे. त्यांचे आम्ही स्वागत करू," असे बच्चू कडू म्हणाले.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्याबाबत धक्कादायक दावा करत, "पक्षामध्ये राऊत यांच्या वक्तव्यांबद्दल मोठी नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना चांगलेच झापले. फक्त मारायचेच बाकी राहिले होते," असे वक्तव्य केले. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, बच्चू कडू यांच्या या दाव्याला ठाकरे गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

राज ठाकरेंच्या टीकेवर सावध भूमिका-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता बच्चू कडू यांनी संयमित प्रतिक्रिया दिली. "हा निर्णय दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाच्या पातळीवर होणारा विषय आहे. त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही," असे ते म्हणाले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांना सूचना-
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. "संकटाच्या काळात जनतेसोबत उभे राहणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे. पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल," असे त्यांनी सांगितले.

टीईटी पेपरफुटीवर कठोर शिक्षेची मागणी-
टीईटी पेपरफुटी प्रकरणावरही बच्चू कडू यांनी तीव्र भूमिका मांडली. "पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा विचार व्हावा. तसेच भविष्यात गैरप्रकार टाळण्यासाठी भरती परीक्षा सैन्य भरतीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात," अशी मागणी त्यांनी केली.