
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : लडाखचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान खालावलेल्या प्रकृतीची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारला त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक नागरिकाचे जीवन अमूल्य असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आवश्यक वैद्यकीय सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
सोनम वांगचुक हे गेल्या १९ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने सरकारी डॉक्टरांकडून दररोज आरोग्य तपासणी करण्यास तसेच त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख ठेवण्याचे आदेश दिले.
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले की, वांगचुक यांच्या आरोग्याची सरकारी आणि खासगी डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली जात असून त्यांच्या प्रकृतीचे अहवालही सातत्याने तयार केले जात आहेत.
यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, वैद्यकीय अहवालात उपचारांची गरज अधोरेखित झाल्यास सरकारने कोणताही विलंब न करता आवश्यक उपचार आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
केंद्र सरकारतर्फे बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वांगचुक यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीस कोणताही विरोध नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सरकारच्या भूमिकेची नोंद घेत समाधान व्यक्त केले.
दरम्यान, सुरू असलेल्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या आरोग्याच्या देखरेखीवर अधिक भर दिला जाणार आहे.