कंपनीशी संबंध संपल्यानंतर मातृत्व लाभ मिळणार नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

    16-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : कराराची मुदत संपल्यानंतर आणि नियोक्ता-कर्मचारी संबंध समाप्त झाल्यानंतर मातृत्व रजा किंवा मातृत्व लाभांचा दावा करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

हे प्रकरण उपनगरातील एका महाविद्यालयात करारावर कार्यरत असलेल्या सहायक प्राध्यापिकेशी संबंधित आहे. कामगार प्राधिकरणाने संबंधित महिलेला मातृत्व लाभ देण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश रद्द करत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, मातृत्व लाभाचा अधिकार केवळ नोकरीचे नाते अस्तित्वात असतानाच लागू होतो.

न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने नमूद केले की, मातृत्व रजेचा उद्देश महिलेला सुरक्षित मातृत्वाचा अनुभव मिळावा तसेच आई आणि बाळाच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे हा आहे. त्यामुळे या अधिकाराचे महत्त्व नाकारता येणार नाही.

तथापि, संबंधित प्रकरणात महिलेचा करार संपल्यानंतर तिने मातृत्व लाभाची मागणी केली होती. यावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत, नियोक्ता-कर्मचारी संबंधच अस्तित्वात नसताना लाभाचा दावा कोणत्या आधारावर केला जाऊ शकतो, असा मुद्दा मांडला.

न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, महाविद्यालयाने गर्भधारणेमुळे तिची सेवा समाप्त केलेली नव्हती किंवा कराराचे नूतनीकरण नाकारले नव्हते. ठरावीक कालावधीचा करार पूर्ण झाल्यामुळे तिची सेवा आपोआप संपुष्टात आली होती. त्यामुळे अशा परिस्थितीत मातृत्व लाभ मिळण्याचा दावा ग्राह्य धरता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.