
Image Source:(Internet)
मुंबई : शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे विकून त्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. दोषी कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
अमरावती जिल्ह्यात कृषी विभागाच्या तपासणीत 'बूस्टर' कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी एवढ्यावरच कारवाई थांबवून चालणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे
संरक्षण करण्यासाठी बियाणे कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
निकृष्ट बियाणे आढळल्यास संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ दर्जेदार बियाणे मोफत द्यावे, तसेच बियाण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास प्रति एकर किमान दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई देणे बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत आलेल्या तक्रारीनंतर तपासणीमध्ये नमुने निकृष्ट आढळल्याने वर्धा येथील यशोदा हायब्रीड सीड्स कंपनीविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोली येथील शेतकरी सुभाष मुजुमले यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
निकृष्ट बियाण्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.