
Image Source:(Internet)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा राज्यात पुनरागमन करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जुलैपासून राज्यातील काही भागांत पावसाची सक्रियता वाढणार असून, कोकणातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून, घाटमाथ्यावर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात हलक्या सरी पडू शकतात, तर १७ जुलैनंतर पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आदी जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात मात्र आजही बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी आज कोणताही हवामान इशारा जारी करण्यात आलेला नाही. मात्र १६ जुलैनंतर विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यभरात २० जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाचा टप्पा सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.