
Image Source:(Internet)
नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेला अमली पदार्थाच्या व्यसनात ओढून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आणि अश्लील छायाचित्रे व चित्रफितींचा आधार घेत दीर्घकाळ ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग कटारिया (२५) आणि आशीष शास्त्री (२५) या दोघांविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत.
तक्रारीनुसार, पीडित महिला विवाहानंतर संगणक प्रशिक्षण वर्गात जात होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिची अनुरागशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर त्याने तिला एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाचे सेवन करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. कालांतराने ती या व्यसनाच्या आहारी गेली.
यानंतर अनुरागने तिची ओळख आशीषशी करून दिली. दोघांनी तिला त्यांच्या राहत्या ठिकाणी नेऊन अमली पदार्थ दिल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी तिची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफितीही तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपींनी वारंवार तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच तिच्या घरी जाऊनही अनेकदा अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
मानसिक आणि शारीरिक छळ असह्य झाल्यानंतर पीडितेने संपूर्ण घटना आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर पतीच्या मदतीने तिने खापरखेडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीची दखल घेत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहेत.