आषाढी एकादशीत धनगर समाज आक्रमक; शेळ्या-मेंढ्यांसह विठ्ठल मंदिर प्रदक्षिणेची तयारी

    15-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने धनगर समाजाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. एकादशीच्या दिवशी नामदेव पायरीचे दर्शन घेतल्यानंतर शेळ्या-मेंढ्यांसह श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला प्रतीकात्मक प्रदक्षिणा घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे.

या आंदोलनाच्या तयारीसाठी पंढरपूर येथील विश्रामगृहात समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत आंदोलनाची दिशा आणि पुढील रणनीती निश्चित करण्यात आली. शासनाने मागण्यांवर त्वरित निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

धनगर समाजाने अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी, पंढरपूर कॉरिडॉरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारणे, सांस्कृतिक भवनासाठी राखीव जागेवरील अतिक्रमण हटविणे, भवनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून देणे तसेच समाजातील सुशिक्षित युवकांना राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमार्फत बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी केली आहे.

आषाढी यात्रेदरम्यान होणाऱ्या या आंदोलनामुळे प्रशासन आणि राज्य सरकारची भूमिका काय असेल, याकडे वारकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

भूमिपूजन झाले; भवनाचे काम मात्र रखडले, समाजाचा सवाल-
धनगर समाजाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनासाठी राखीव असलेल्या जागेवरील अतिक्रमणाचाही मुद्दा उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या जागेवरच अतिक्रमण झाल्याचा आरोप करत, नगरपरिषद प्रशासन दुहेरी भूमिका घेत असल्याची टीका करण्यात आली.

सामान्य नागरिकांवरील अतिक्रमण कारवाई वेगाने केली जाते, मात्र आरक्षित शासकीय जागेवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप समाजाने केला आहे. महापूजेसाठी पंढरपुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमोर "भूमिपूजन झाले, पण सांस्कृतिक भवन अद्याप उभे का राहिले नाही?" आणि "अतिक्रमणावर कारवाई का होत नाही?" असा थेट प्रश्न उपस्थित केला जाणार असल्याचे समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.