'आपली बस' होणार हायटेक! नागपुरात AI च्या मदतीने मोजली जाणार प्रवाशांची संख्या

    15-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या 'आपली बस' सेवेला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड मिळणार आहे. बससेवा अधिक पारदर्शक, अचूक आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने महापालिकेने पाच बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एआय-आधारित स्वयंचलित प्रवासी गणना प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


या प्रणालीमुळे बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी आपोआप मोजले जाणार आहेत. त्यामुळे तिकीट विक्री आणि प्रत्यक्ष प्रवाशांची संख्या यामध्ये तफावत असल्यास ती त्वरित लक्षात येईल. यामुळे महसुलातील गळती रोखण्यास मदत होणार असून, बससेवेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.


परिवहन समितीच्या अध्यक्षा मंगला खेकरे यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणानुसार हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सुरुवातीला पाच बसेसमध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर त्याचे परिणाम सकारात्मक आढळल्यास संपूर्ण बस ताफ्यात ही प्रणाली लागू करण्याचा विचार केला जाईल.


या प्रकल्पासाठी आवश्यक निधी महापालिकेच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली जाणार आहे. प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागार नियुक्ती, निविदा प्रक्रिया आणि तांत्रिक आराखडा तयार करण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.


सध्या 'आपली बस' सेवेत तिकीट तपासणीसाठी ५२ तपासनीस कार्यरत आहेत. मात्र, एआय प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांची अचूक नोंद आपोआप होणार असल्याने भविष्यात तपासणीसाठी लागणारे मनुष्यबळ कमी करण्याचा विचार आहे.


ही प्रणाली विद्यमान इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमशी जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मार्गावरील प्रवाशांची संख्या, गर्दीचे प्रमाण आणि बसची गरज याचे अचूक विश्लेषण होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि स्मार्ट बनण्यास मदत होणार आहे.