16 वर्षांची प्रतीक्षा संपली! स्पेन पुन्हा फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये

    15-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेनने मोठा पराक्रम करत फ्रान्सचा 2-0 ने पराभव केला. या विजयासह स्पेनने तब्बल 16 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दोन वेळचा विश्वविजेता फ्रान्स स्पर्धेबाहेर पडला.

अमेरिकेतील डॅलस स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मात्र पहिला गोल करण्याची संधी स्पेनला मिळाली. 22 व्या मिनिटाला मिकेल ओयार्झाबालने पेनल्टीवर अचूक गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

स्पेनला ही पेनल्टी 19 वर्षीय लॅमिन यामालवर झालेल्या फाऊलमुळे मिळाली. फ्रान्सचा डिफेंडर लुकास डिग्नेने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी पंचांनी पेनल्टी दिली.

पहिल्या सत्रात स्पेनने ही आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या सत्रात 58 व्या मिनिटाला पेड्रो पोरोने आणखी एक गोल करत स्पेनची आघाडी 2-0 अशी केली.

यानंतर फ्रान्सने अनेकदा गोल करण्याचा प्रयत्न केला. किलियन एम्बाप्पेनेही आक्रमण केले, पण स्पेनच्या मजबूत बचावामुळे फ्रान्सला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे फ्रान्सचा विजेतेपदाचा प्रवास उपांत्य फेरीतच थांबला.

या विजयासह स्पेनने आपल्या इतिहासात दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी 2010 मध्ये नेदरलँड्सचा पराभव करून स्पेनने पहिले विश्वचषक जिंकले होते. आता पुन्हा एकदा विजेतेपद जिंकण्याची संधी स्पेनसमोर आहे.

अंतिम फेरीत स्पेनचा सामना इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील उपांत्य फेरीच्या विजेत्या संघाशी होणार आहे. त्यामुळे आता स्पेन पुन्हा विश्वविजेता ठरणार का, याकडे फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे.