
Image Source:(Internet)
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेचा विषय ठरला आहे. ठाकरे गटातील सहा खासदार आणि एका विधानपरिषद सदस्याच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर सुरू झालेल्या चर्चांना आता मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने आणखी बळ मिळाले आहे. पक्षवाढीची मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले.
एका जाहीर सभेत बोलताना उदय सामंत म्हणाले, "ऑपरेशन टायगर कधीही थांबणार नाही. ही मोहीम पुढेही सुरूच राहील. महानगरपालिका सदस्य, आमदार, माजी आमदार, खासदार आणि माजी खासदार अशा विविध स्तरांवरील नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत येतील. गडचिरोलीपासून सावंतवाडीपर्यंत पक्षाची ताकद वाढत आहे. या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दिल्ली दौऱ्याकडे लक्ष-
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असून, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमध्ये राजकीय हालचाली-
नाशिक महापालिकेतील काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांमुळे ठाकरे गटातही हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील काही नगरसेवकांना 'मातोश्री'वर चर्चेसाठी बोलावल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांनी पक्षांतराच्या सर्व चर्चा फेटाळून लावत, त्या केवळ अफवा असल्याचा दावा केला आहे. तरीही खासदार संजय राऊत यांचा नियोजित नाशिक दौरा रद्द झाल्याने आणि परिस्थितीवर थेट मातोश्रीवरून लक्ष ठेवले जात असल्याच्या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना अधिकच वेग आला आहे.