
Image Source:(Internet)
नागपूर : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाने नागपुरात आंदोलन करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी आंदोलकांना अडवून ताब्यात घेतले.
महालमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. गडकरी यांचे निवासस्थान जवळ असल्याने संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घोषणाबाजी करत आंदोलक पुढे सरकत असतानाच पोलिसांनी त्यांना अडवून मोर्चा पुढे जाऊ दिला नाही.
आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक भूषण ढाकुलकर यांनी सांगितले की, हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आहे. वाहनधारकांच्या हितासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनामुळे महाल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला असून, नागरिकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत परिसरात शांतता प्रस्थापित केली.
दरम्यान, केंद्र सरकारच्या E20 (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) धोरणाला देशातील काही वाहनधारक संघटना विरोध करत आहेत. जुन्या वाहनांमध्ये या इंधनामुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होण्याची, मायलेज घटण्याची आणि देखभाल खर्च वाढण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांसाठी इथेनॉलमुक्त पेट्रोल उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी पुन्हा करण्यात आली.