
Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाच्या यार्ड परिसरात मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. मालगाडीवर चढलेल्या एका अज्ञात तरुणाचा हाय व्होल्टेज करंट लागून जागीच मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या मालगाडीवर उडी मारताच तो करंटच्या तावडीत सापडला.
घटना नेमकी काय?
मंगळवारी पहाटे सुमारे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीवर चढला आणि वरून जाणाऱ्या ओव्हरहेड वीजवाहिनीजवळ पोहोचला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी संबंधित मार्गावरील वीजपुरवठा तातडीने बंद केला आणि त्याला सुरक्षित खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला.
मात्र, त्याचवेळी त्या तरुणाने अचानक पहिल्या मालगाडीवरून उडी मारून शेजारच्या रुळावर उभ्या असलेल्या दुसऱ्या मालगाडीवर झेप घेतली. त्या मार्गावरील वीजपुरवठा सुरू असल्याने त्याला हाय व्होल्टेज करंट लागला. या भीषण अपघातात तो गंभीर भाजला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तपास सुरू-
घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच तो मालगाडीवर का चढला आणि या दुर्घटनेमागील कारण काय, याचा तपास सुरू आहे.