
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे... 17 जुलैला होणाऱ्या संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार? विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या दोन मंत्रिपदांवरून पक्षात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शिवसेनेचे सर्व खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीकडे रवाना होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र खरी उत्सुकता आहे ती राज्यमंत्रीपदाची.
ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका खासदाराला दिल्लीत मंत्रिपदाची संधी मिळू शकते. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नावांची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनीही आशा बाळगली असून, अंतिम निर्णयाची प्रतीक्षा सुरू आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर कोणाच्या राजकीय कारकिर्दीला नवी दिशा मिळणार आणि कोणाला आणखी प्रतीक्षा करावी लागणार, याचा फैसला 17 जुलैच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला या विस्तारात स्थान मिळणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळणार आहेत.