
Image Source:(Internet)
मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवर काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. "अजित पवारांचा पक्ष फार काळ एकसंध राहणार नाही. लवकरच त्यात फूट पडेल," असा दावा त्यांनी केला.
सपकाळ यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही सुरळीत नसून अनेक नेत्यांमध्ये मतभेद उघडपणे समोर येत आहेत. इतकेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही नाराजीचे वातावरण असल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीतील पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची टीका केली.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, या चर्चांवर संबंधित पक्षाने स्पष्ट भूमिका मांडणे अपेक्षित आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात भूमिका मांडल्याचेही त्यांनी नमूद केले.
राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणावरूनही सपकाळ यांनी सरकार आणि विश्वस्त मंडळावर जोरदार हल्लाबोल केला. हा प्रकार काही व्यक्तींपुरता मर्यादित नसून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संबंधित विश्वस्तांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संभाव्य समावेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. "सत्ता आणि पदांवर एकाच कुटुंबाचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला.
शिवस्मारक आणि इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या रखडलेल्या कामांवरून सरकारवर टीका करत, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे भाजपसमोर मोठे आव्हान ठरतील, असा विश्वासही हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.