
Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी वेळेवर कारवाई करत पेपरफुटीचा कट उधळून लावल्याचा दावा करत त्यांनी राहुल गांधींनी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरच आरोप करावेत, असे म्हटले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पेपरफुटी झाल्यानंतर नव्हे, तर परीक्षा होण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान पेपरफुटीचा कट उघडकीस आल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावरील टीकेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, "त्यांनी हे ट्विट भारतातून केले की परदेशातून, हे मला माहिती नाही. ते अनेकदा परदेश दौऱ्यावर असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील घडामोडींची संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसावी."
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी हे आंतरराज्यीय टोळीशी संबंधित असून, त्यांच्या अटकेमुळे इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या पेपरफुटीच्या घटना टाळण्यास मदत झाली आहे.
तसेच, राज्य सरकारवर टीका करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वतःच्या पक्षाच्या कारभाराचेही आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.