
Image Source:(Internet)
नागपूर : शहरात वाहनचोरीच्या मालिकेचा उलगडा करत अजनी पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गणेशपेठ येथील गाडीखाना परिसरात राहणाऱ्या ओम उर्फ रवि नरेंद्र येडे (वय २१) याला अजनी पोलिसांनी अटक केली. अयोध्यानगरमधील लाडीकर लेआउट येथील रहिवासी अजय पाटील यांची केटीएम दुचाकी शताब्दी चौक परिसरातून चोरीला गेल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता.
तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये संशयिताची ओळख पटल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, गस्तीदरम्यान आरोपी चोरीच्या केटीएम दुचाकीसह फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आणखी तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी चारही चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीविरुद्ध यापूर्वीही वाहनचोरीचे पाच गुन्हे दाखल असून, इतर गुन्ह्यांच्या अनुषंगानेही त्याची चौकशी सुरू आहे.