विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी; तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली शाळांच्या कॅन्टीनची राज्यभर झाडाझडती

    13-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांतील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन योजना आणि अन्नपुरवठा करणाऱ्या संस्थांची राज्यभर कसून तपासणी केली जाणार आहे.

भेसळयुक्त अन्नाविरोधातील धडक कारवाईनंतर आता एफडीएने थेट शाळांमधील अन्नसुरक्षेकडे मोर्चा वळवला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

या मोहिमेच्या अनुषंगाने मुंबईत खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मध्यान्ह भोजन पुरवठादारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अन्नसुरक्षा कायद्याचे पालन, स्वच्छतेचे निकष, पौष्टिक आहाराची गुणवत्ता आणि अन्न हाताळणीतील आवश्यक नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

एफडीएचे सहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगारवाड यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था आणि संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. यापूर्वी मध्यान्ह भोजनात निकृष्ट दर्जाचे अन्न, दूषित पदार्थ तसेच अळ्या आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. अनेक शाळांच्या कॅन्टीनमधील अस्वच्छतेमुळेही ही मोहीम अधिक व्यापक करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारने शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' ऊर्जा पेयाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यानंतर एफडीएने शाळा परिसरातील अन्नसुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

भेसळयुक्त अन्न, अस्वच्छता किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.

रक्तपेढ्यांवरही एफडीएची कठोर कारवाई-
रक्तसुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी राज्यातील १९ रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. रक्तसंकलन, साठवणूक, वितरण, शीतसाखळी व्यवस्थापन आणि इतर वैधानिक निकषांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथील संबंधित रक्तपेढ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.