चंद्रपुरातील आंतरराज्यीय किडनी तस्करी प्रकरणात एसआयटीची कारवाई; मुख्य एजंटची क्रेटा कारसह 11.50 लाखांची रक्कम जप्त

    13-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

चंद्रपूर : राज्याला हादरवून सोडणाऱ्या आंतरराज्यीय किडनी तस्करी प्रकरणाच्या तपासात विशेष तपास पथकाला (एसआयटी) महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या रॅकेटचा मुख्य एजंट डॉ. कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू याच्या बेकायदेशीर संपत्तीवर कारवाई करत एसआयटीने गुन्ह्यात वापरण्यात आलेली हुंडई क्रेटा कार आणि त्याच्या भावाच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली 11 लाख 50 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. कृष्णा हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांना विविध आमिषे दाखवून किडनी विकण्यास प्रवृत्त करत होता. या बेकायदेशीर व्यवहारातून त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचा संशय आहे. याच अवैध पैशातून त्याने 2024 मध्ये एमएच-13-ईके-8578 क्रमांकाची हुंडई क्रेटा रोख रक्कम देऊन खरेदी केली होती.

एसआयटीच्या तपासात या वाहनाचा वापर किडनी दानाच्या नावाखाली फसवून आणलेल्या पीडितांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही कार डॉ. कृष्णाच्या भावाकडून वापरली जात होती. माहिती मिळताच एसआयटीने वाहन जप्त केले.

याशिवाय, किडनी तस्करीतून मिळालेली रक्कम लपवण्यासाठी डॉ. कृष्णाने आपल्या भावाच्या खात्याचा वापर केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. त्याने भावाच्या खात्यात 11 लाख 50 हजार रुपये वर्ग केल्याचे समोर आल्यानंतर एसआयटीने ती रक्कमही जप्त केली.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच एसआयटी प्रमुख ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

20 जुलैला जामीन अर्जावर सुनावणी-
या प्रकरणातील मुख्य एजंट डॉ. कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू आणि दिल्लीतील डॉ. रविंद्रपाल सिंह, ज्यांच्यावर पीडितांची बेकायदेशीर शस्त्रक्रिया करून किडनी काढल्याचा आरोप आहे, हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोविंदसामी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी एसआयटीची पथके तमिळनाडूसह विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवत आहेत.

डॉ. कृष्णा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यावर 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.