संघ मुख्यालयाला भेट देऊन हेडगेवारांना अभिवादन करा;नागपूर दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरेंना रवी राणांचे आव्हान

    13-Jul-2026
Total Views |

अमरावती : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नागपुरात येण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूर्वी हिंदुत्वापासून दूर राहणारे ठाकरे आता हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाचा उल्लेख करत असल्याचे सांगत त्यांनी त्यावर उपरोधिक टीका केली.

हनुमान चालीसा आंदोलनाचा संदर्भ देताना राणा म्हणाले की, 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने माझ्यासह तत्कालीन खासदार नवनीत राणा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता आणि १४ दिवस तुरुंगात ठेवले होते. मात्र आज तेच हिंदुत्व आणि हनुमान चालीसेची भूमिका मांडत आहेत, असे त्यांनी म्हटले.

याचवेळी रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना अमरावतीतील प्रसिद्ध हनुमान गढी येथे भेट देण्याचे निमंत्रणही दिले. ते अमरावतीत आल्यास स्वतः स्वागत करून त्यांच्यासोबत हनुमान चालीसेचे पठण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे नागपूर दौऱ्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे-राणा यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.