आमिर खानच्या लग्नालाही लव्ह जिहाद म्हणायचं का?; मंत्री नितेश राणेंचा सवाल, राजकीय चर्चांना उधाण

    13-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

शिर्डी : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या विवाहावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या विवाहाचा संदर्भ देत "अशा घटनांना लव्ह जिहादचे उदाहरण मानायचे का?" असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या राजकीय व सामाजिक चर्चेला तोंड फुटले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना नितेश राणे म्हणाले, "प्रसिद्ध व्यक्तींच्या वैयक्तिक निर्णयांचा समाजावर परिणाम होत असतो. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ वैयक्तिक बाब म्हणून पाहता येणार नाही."

राणे यांनी हिंदू समाजाला आवाहन करताना म्हटले की, कोणत्याही सेलिब्रिटीला आदर्श मानण्यापूर्वी किंवा त्याला पाठिंबा देण्यापूर्वी त्याच्या कृतींचा विचार करणे आवश्यक आहे. "'लव्ह जिहाद'चा चेहरा कोण आहे, याचाही समाजाने विचार करायला हवा," असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी चित्रपटांवर बहिष्काराबाबतही भाष्य केले. "कोणाला स्टार बनवायचे आणि कोणाला पाठिंबा द्यायचा, हा निर्णय जनतेचाच असतो. त्यामुळे समाजाने अशा बाबींवर सजगपणे भूमिका घ्यावी," असे राणे म्हणाले.

दरम्यान, अभिनेता आमिर खान यांनी 5 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल निवासस्थानी एका खासगी समारंभात गौरी स्प्रॅट यांच्याशी विवाह केला. वेलनेस आणि ब्युटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या गौरी स्प्रॅट यांच्यासोबत आमिर खान गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जाते.

हे आमिर खान यांचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्यांचा विवाह रीना दत्ता आणि त्यानंतर चित्रपट निर्माती किरण राव यांच्याशी झाला होता. दोघांपासून विभक्त झाल्यानंतर आता त्यांनी गौरी स्प्रॅट यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे आमिर खानच्या लग्नावरून राजकीय वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पडली असून, त्यांच्या विधानावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.