वारीत उमटला सामाजिक ऐक्याचा संदेश; मुस्लिम समाजाने सेवाभावातून जिंकली वारकऱ्यांची मने

    13-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

अहमदनगर : आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक सलोखा, समता आणि माणुसकीचा उत्सव असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. श्रीक्षेत्र नेवासाहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे अहमदनगरच्या कोठला परिसरात मुस्लिम समाज आणि आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशन यांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

दिंडीचे आगमन होताच संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत सेवाभावाचे दर्शन घडवले. वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत करत त्यांनी मानवतेचा अनोखा संदेश दिला.

या आत्मीय स्वागतामुळे वारकरीही भावूक झाले. अनेकांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानत परस्पर स्नेह आणि बंधुभाव व्यक्त केला. धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन समाजाला एकत्र आणणारे हे दृश्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.

यावेळी साहेबाना जहागीरदार यांनी सांगितले की, वारकऱ्यांची सेवा करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. वारी ही समाजाला एकत्र आणणारी परंपरा असून प्रेम, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारी चळवळ आहे. समाजात सौहार्द कायम राहावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील काळातही दरवर्षी अशाच उत्साहाने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माणुसकी, परस्पर सन्मान आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम वारीच्या परंपरेतील सर्वसमावेशक संस्कृतीचे जिवंत उदाहरण ठरला.