नागपुरात विटा भरण्याच्या वादातून रक्तरंजित शेवट; फावड्याच्या घावात मजुराचा मृत्यू, सहकारी अटकेत

    13-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विटभट्टीवर क्षुल्लक कारणावरून झालेला वाद जीवघेणा ठरला. विटा भरण्याच्या कामावरून दोन मजुरांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात एका मजुराने सहकाऱ्याच्या डोक्यावर फावड्याने जोरदार वार केला. गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कलमना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुनील सतनामी (40) आणि आरोपी हिमांशू उर्फ गुड्डू सोनटक्के (28) हे दोघेही कलमना परिसरातील बबलू खान यांच्या विटभट्टीवर मजुरीचे काम करत होते. दोघांची पूर्वीपासून ओळख होती.

रविवारी (12 जुलै) विटा भरण्याच्या कामादरम्यान दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही क्षणांतच वातावरण चिघळले. आरोपीनं संतापाच्या भरात जवळच असलेले फावडे उचलून सुनीलच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.

या हल्ल्यात सुनील गंभीर जखमी झाला. सहकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृताची पत्नी सीमा सतनामी यांनी कलमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी हिमांशू सोनटक्के याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कलमना पोलीस करीत आहेत.