जेजुरीजवळ भीषण अपघात; भरधाव ट्रकने तीन वारकरी महिलांना चिरडले

    13-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

जेजुरी (पुणे) : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ सोमवारी पहाटे एक हृदयद्रावक अपघात घडला. सासवड–जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ भरधाव वेगातील ट्रकने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या समूहाला धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघात सोमवारी सकाळी शिपदीप लॉजिंगसमोरील परिसरात झाला. वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत पायी मार्गक्रमण करत असताना भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट वारकऱ्यांच्या समूहात घुसला. या दुर्घटनेमुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

अपघातानंतर स्थानिक नागरिक, वारकरी आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत महिलांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे आषाढी वारीवर शोककळा पसरली असून वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.