व्हिएतनाममध्ये भीषण दुर्घटना; 33 भारतीय पर्यटकांची बोट उलटली, अनेक बेपत्ता; 15 जणांच्या मृत्यूची भीती

    11-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

हनोई : व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण अपघात झाला आहे. 33 भारतीय पर्यटकांसह प्रवास करणारी बोट अचानक उलटल्यानंतर मोठी दुर्घटना घडली असून, सुमारे 15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक प्रवासी बेपत्ता असल्याने शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बोट उलटल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळाजवळील इतर बोटी तातडीने मदतीसाठी धावून आल्या. मात्र, काही प्रवासी उलटलेल्या बोटीमध्ये अडकून पडल्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. बचाव पथकाने काही जणांना सुरक्षित बाहेर काढले असून, उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे.

हनोई येथील भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेत स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. अपघाताचे नेमके कारण, प्रवाशांची ओळख आणि त्यांच्या स्थितीबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसेच प्रभावित भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी हनोई आणि हो ची मिन्ह सिटी येथील भारतीय वाणिज्य दूतावासात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

या दुर्घटनेतील मृतांचा आणि जखमींचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला, तरी अनेक प्रवासी बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे भारतातील संबंधित पर्यटकांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.