राम मंदिर दान प्रकरणावरून ठाकरे गट पुन्हा आक्रमक; ठाण्यात आंदोलनाची घोषणा

    11-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट)ने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ ठाण्यात आज दुपारी ४ वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही ठाकरे गटाने दादर येथे 'रामरक्षा आंदोलन' आयोजित केले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांनी रामरक्षेचे पठण आणि धार्मिक गीतांच्या माध्यमातून निषेध नोंदवला होता. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती.

राम मंदिर दान प्रकरणातील कथित गैरव्यवहाराचा निषेध करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे ठाण्यात होणाऱ्या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.