
Image Source:(Internet)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांचा विवाह निश्चित झाला असून, 29 जुलै रोजी पुण्यात कायनात धार यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पार्थ पवार आणि कायनात धार यांच्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध चर्चांना उधाण आले होते. विशेषतः सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या विवाह सोहळ्यात दोघेही एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले असून, कायनात धार या पार्थ पवार यांच्या भावी पत्नी असणार आहेत.
कायनात धार या सध्या दिल्लीमध्ये कार्यरत असून, त्यांचे पवार कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते. आनंदाच्या प्रसंगांबरोबरच त्यांनी कठीण काळातही पवार कुटुंबाची साथ दिली. अजित पवार यांच्या निधनानंतर त्या बारामतीत जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या. तसेच वरळी येथे आयोजित शोकसभेलाही त्यांनी हजेरी लावली होती.
याआधीही पार्थ पवार आणि कायनात धार उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन व पूजा करतानाचे फोटो चर्चेत आले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याविषयीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले होते.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर पार्थ पवार यांनी राजकारणात अधिक सक्रिय भूमिका स्वीकारली आहे. सध्या ते दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक आणि संसदीय कामकाजाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.
पार्थ पवार यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात पार पडणार असून, त्यानंतर विवाह सोहळ्याच्या तारखेची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पवार कुटुंबातील या शुभवार्तेमुळे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.