'पंड्या स्टोअर' फेम अभिनेता रोहित चंडेल अटकेत; अल्पवयीन मुलीच्या छळप्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा

    11-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका 'पंड्या स्टोअर' आणि 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता रोहित चंडेल (वय 29) याला अल्पवयीन मुलीच्या छळप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 16 वर्षीय मुलीचा पाठलाग करणे, वारंवार फोन करून त्रास देणे आणि मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीच्या वतीने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, रोहित चंडेल हा पीडित मुलीला स्वतःच्या तसेच इतर मोबाईल क्रमांकांवरून वारंवार फोन करून त्रास देत होता. त्यामुळे मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच 5 जुलै रोजी रोहितने मुलीला तिच्या राहत्या इमारतीजवळ अडवून तिच्याशी वाद घातला, तिचा पाठलाग केला, शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचाही आरोप आहे. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी शुक्रवारी दहिसर येथून रोहित चंडेलला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

रोहित चंडेल सध्या स्टार प्लसवरील 'सैराब' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्याच्या अटकेनंतर मालिकेच्या निर्मात्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात असून, पुढील घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया अधिक गंभीर मानली जात आहे.