
Image Source:(Internet)
नागपूरच्या जुनी कामठी रोड परिसरातील पूर्णिमा अगरबत्ती निर्मिती कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीमुळे परिसर धुराने व्यापला गेला होता. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारखान्यातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.
नागपूरच्या जुनी कामठी रोडवरील पूर्णिमा अगरबत्ती निर्मिती कारखान्यात शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. अगरबत्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. धुराचे मोठे लोट आणि आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अनेक तासांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी कारखान्यातील कच्चा माल, तयार अगरबत्त्यांचा साठा, पॅकिंग साहित्य आणि इतर उपकरणे जळून नष्ट झाली. त्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक तपासात विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून, वेळेत अग्निशमन दलाने केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.