
ImgSource-(Internet)
मुंबई : नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो **'लॉक अप'**चा दुसरा सीझन सुरू होताच स्पर्धकांबरोबरच शोचे नवे होस्टही चर्चेचा विषय ठरले आहेत. यंदाच्या पर्वात बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान आणि अभिनेता रितेश देशमुख ही जोडी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसत आहे. दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच त्यांच्या मानधनाबाबतही चर्चा रंगू लागली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फराह खानला **'लॉक अप 2'**च्या प्रत्येक भागासाठी सुमारे 15 ते 25 लाख रुपये मानधन मिळत असल्याची चर्चा आहे. मात्र, या रकमेबाबत शोचे निर्माते किंवा फराह खान यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तरीही सोशल मीडियावर या मानधनाच्या आकड्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
फराह खानला रिअॅलिटी शोच्या दुनियेचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी 'बिग बॉस', 'झलक दिखला जा', 'खतरों के खिलाड़ी', 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'इंडियन आयडॉल' यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक किंवा परीक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाला साजेसे मानधन मिळत असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे अभिनेता रितेश देशमुख याच्या मानधनाबाबतही उत्सुकता कायम आहे. अधिकृत आकडा समोर आलेला नसला तरी काही रिपोर्ट्सनुसार त्याला प्रत्येक एपिसोडसाठी 30 ते 40 लाख रुपये मिळत असल्याची चर्चा आहे. म्हणजेच रितेशचे मानधन फराह खानपेक्षाही अधिक असल्याचा दावा केला जात आहे.
रितेशने यापूर्वी **'बिग बॉस मराठी'**चे यशस्वी सूत्रसंचालन केले असून, त्याची सहज आणि प्रभावी होस्टिंग शैली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. स्पर्धकांशी संवाद साधण्याची त्याची पद्धत आणि प्रसंगानुरूप परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य पाहता 'लॉक अप 2'साठी त्याची निवड करण्यात आल्याचे मानले जाते.
दरम्यान, 'लॉक अप' हा सेलिब्रिटी आधारित रिअॅलिटी शो असून, स्पर्धकांना 'जेल'च्या संकल्पनेत विविध टास्क आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन कंगना रणौत आणि करण कुंद्रा यांनी केले होते. तर दुसऱ्या पर्वात राम कपूर, आकांक्षा चमोला, श्रेया कालरा, सुनीता आहुजा, हर्षद चोप्रा, सूफी मोतीवाला आणि शिवांगी जोशी यांसारखे कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.