
IMG Source-(Internet)
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हा सर्वात परवडणारा पर्याय मानला जातो. मात्र अनेकांना हे माहिती नसते की, भारतीय रेल्वे काही विशिष्ट प्रवासी गटांना तिकीट दरात विशेष सवलत देते. विद्यार्थी, दिव्यांग आणि गंभीर आजारांवरील उपचारासाठी प्रवास करणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र त्यासाठी रेल्वेने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
रेल्वेच्या विद्यमान नियमांनुसार, दिव्यांग प्रवासी, शैक्षणिक कारणांसाठी प्रवास करणारे विद्यार्थी तसेच कर्करोग, क्षयरोग, थॅलेसेमिया, मूत्रपिंडाचे आजार आणि संसर्गजन्य नसलेला कुष्ठरोग अशा गंभीर आजारांवरील उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना तिकीटाच्या मूळ भाड्यावर (Basic Fare) सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी संबंधित प्रवाशांनी रेल्वेने निर्धारित केलेली कागदपत्रे आणि आवश्यक पास सादर करणे बंधनकारक आहे.
साधारणपणे 300 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी ही सवलत लागू होते. मात्र परीक्षा देण्यासाठी जाणारे विद्यार्थी, शैक्षणिक सहल, संशोधनासाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि उपचारासाठी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना 300 किलोमीटरची अट लागू होत नाही.
दिव्यांग प्रवाशांमध्ये दृष्टीदोष असलेले, अस्थिदिव्यांग, चालण्यास अडचण असलेले तसेच इतर पात्र दिव्यांग नागरिकांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनाही शिक्षण, परीक्षा किंवा शैक्षणिक उपक्रमांसाठी रेल्वे प्रवास करताना या सवलतीचा लाभ घेता येतो.
मात्र या सवलतीसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. प्रवाशाने ज्या उद्देशासाठी सवलतीचे तिकीट घेतले आहे, त्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंतच प्रवास करणे आवश्यक आहे. मध्येच प्रवास थांबवणे किंवा दुसऱ्या स्थानकावर उतरणे नियमबाह्य मानले जाते.
तसेच ही सुविधा सर्व रेल्वे गाड्यांमध्ये उपलब्ध नाही. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस, गरीब रथ आणि हमसफर एक्सप्रेस यांसारख्या काही प्रीमियम गाड्यांमध्ये ही सवलत सर्व प्रवाशांना लागू होत नाही. संबंधित श्रेणी आणि नियमांनुसारच लाभ दिला जातो.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चुकीच्या तिकीटावर प्रवास करणे, विनातिकीट प्रवास करणे किंवा सवलतीच्या तिकीटाचा गैरवापर केल्यास संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई होऊ शकते आणि सवलतीचाही लाभ रद्द केला जाऊ शकतो.
वैद्यकीय सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णाने मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र रेल्वे आरक्षण केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्रतेनुसार तिकीटाच्या भाड्यात थेट सवलत दिली जाते.