दूध भेसळ प्रकरणात एफडीए अॅक्शन मोडवर; तुकाराम मुंढेंचा मोठ्या डेअऱ्यांवरही फोकस

    10-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यातील दूध भेसळीविरोधातील मोहिमेला अधिक धार देत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता मोठ्या दुग्ध प्रक्रिया उद्योगांचीही कसून तपासणी सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत इंदापूर आणि मंचर परिसरातील दोन प्रमुख डेअरी कंपन्यांमध्ये तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान संबंधित कंपन्यांकडील दूध खरेदीची नोंद, पुरवठादारांची माहिती, गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया तसेच यापूर्वी कारवाई झालेल्या दूध संकलन केंद्रांशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत का, याची पडताळणी करण्यात आली. भेसळयुक्त दूध पुरवठा साखळीशी कोणताही संबंध आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

यापूर्वी एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यातील १३ ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत पाणी, स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शाम्पू आणि पामतेल यांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे उघड झाले. हे दूध नैसर्गिक दुधात मिसळून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून दोन महिन्यांत अहवाल सादर केला जाणार आहे. गैरव्यवहार, बोगस संस्था किंवा इतर अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.

दूध भेसळीला आळा घालण्यासाठी एफडीएने राज्यभर नव्या मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. कच्च्या दुधाच्या विक्रीवेळी प्रत्येक पात्रावर 'कच्चे दूध' असा स्पष्ट उल्लेख आणि 'हे दूध उकळल्यानंतरच वापरावे' अशी सूचना देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच पाश्चराइज्ड दूध फक्त सीलबंद आणि लेबलयुक्त पॅकेजिंगमध्येच विक्री करता येणार आहे. दूध संकलन, वाहतूक, साठवण आणि विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता, शीतसाखळी आणि गुणवत्ता नियंत्रणाचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा एफडीएने दिला आहे.