
IMG Source-(Internet)
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा विधानसभेत चर्चेचा विषय ठरला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत आपल्या सरकारवरच नाराजी व्यक्त करत, सावरकरांना भारतरत्न देण्यासाठीचा ठराव अद्याप सभागृहात का मांडला गेला नाही, असा थेट सवाल उपस्थित केला.
विधानसभेत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, यापूर्वी सरकारने सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्राकडे शिफारस करणारा ठराव आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्याच्या कामकाज पत्रिकेत त्याचा समावेश नसल्याने त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली.
"स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांनी अमानुष छळ सहन करावा लागला. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याऐवजी त्यांच्या प्रस्तावालाच विलंब लावणे योग्य नाही. फाईल इतके दिवस का प्रलंबित ठेवली आहे?" असा सवाल त्यांनी सरकारला केला.
भाजपच्या जाहीरनाम्यातही सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, याची आठवण करून देत मुनगंटीवार म्हणाले, "सत्ता मिळाल्यानंतर दिलेल्या आश्वासनांचा विसर पडू नये. सावरकरांच्या विचारांवर आम्ही राजकारण केले, त्यांच्या विचारसरणीचा वारसा जपला. मग त्यांच्याच सन्मानाचा प्रस्ताव रखडणे योग्य नाही."
मुनगंटीवार यांच्या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत हा प्रस्ताव आज चर्चेसाठी न आणण्यामागचे कारण स्पष्ट केले. या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी पुढील अधिवेशनात सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, याच अधिवेशनात अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणावरूनही सभागृहात गदारोळ झाला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जयंत पाटील यांनी या मुद्द्यावर सरकारला घेरले. या चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली.