किती जळजळ, किती मळमळ...'; विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

    10-Jul-2026
Total Views |
शरद पवारांच्या भेटीवरून दिले प्रत्युत्तर

IMG Source-(Internet)

मुंबई :
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच घेतलेल्या त्यांच्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चेला उत्तर देताना शिंदेंनी शिवसेना (ठाकरे गट)वर थेट निशाणा साधला.

सभागृहात बोलताना शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकजण भेटतात. आम्ही कधी त्याबद्दल प्रश्न उपस्थित केला नाही. कारण आमच्यात परस्परांवरील विश्वास आहे. काही जण मात्र या भेटींमधून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत."

शरद पवार यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना शिंदे म्हणाले की, सीमावादासंदर्भातील बैठकीनंतर पवार त्यांच्या दालनात आले होते. त्यावेळी ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. "पवार साहेब आले असल्याचे समजताच मी तातडीने त्यांच्या भेटीस गेलो. ते राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. त्यामुळे मी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला," असे त्यांनी सांगितले.

यानंतर विरोधकांवर टीकेची झोड उठवत शिंदे म्हणाले, "या भेटीनंतर काहींची प्रचंड जळजळ झाली. किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ... हे सगळं पाहायला मिळालं. अशा प्रकारच्या राजकारणाने काहीही साध्य होणार नाही."

यावेळी त्यांनी आपण रुग्णालयात उपचार घेत असतानाही शासनाचे कामकाज थांबले नव्हते, असे सांगत, "आम्ही सहानुभूतीचे राजकारण करणारे नाही. जनतेसाठी काम करणे हाच आमचा स्वभाव आहे," असेही नमूद केले.

शिंदे यांच्या या भाषणामुळे विधान परिषदेत काही काळ वातावरण तापले. शरद पवारांच्या भेटीवरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेला उत्तर देताना त्यांनी महायुतीतील एकजूट अधोरेखित केली आणि विरोधकांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या राजकीय तर्कांना फेटाळून लावले.