
IMG Source-(Internet)
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनातील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रिसोडचे आमदार अमित झनक यांच्या जेवणात माशी आढळल्याची घटना समोर आल्यानंतर पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली.
ठाकरे यांनी सभागृहात सांगितले की, राज्यातील लोकप्रतिनिधींनाच विधानभवनात स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. ही घटना केवळ एक अपवाद नसून भोजन व्यवस्थेतील त्रुटी आणि स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षाचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच विधानभवनातील कँटीनमधील स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि संपूर्ण भोजन व्यवस्थेची तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या घटनेनंतर विधानभवनातील कँटीनच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले असून, चौकशी अहवालानंतर संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.