
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने रक्तपेढ्यांमधील अनियमिततेविरोधात मोठी कारवाई करत मुंबईतील जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांचे परवाने निलंबित केले आहेत. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे दोन्ही रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन, रक्तघटक निर्मिती, साठवणूक, वितरण आणि विक्रीसह सर्व प्रकारचे कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.
दोन्ही रक्तपेढ्यांबाबत रक्तसंकलन, साठवणूक, तपासणी, गुणवत्ता नियंत्रण आणि आवश्यक नोंदींच्या व्यवस्थापनात गंभीर त्रुटी असल्याच्या तक्रारी FDA कडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर FDA आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) यांच्या संयुक्त पथकाने तपासणी केली. तपासणीत विविध नियमांचे उल्लंघन आणि अनेक गंभीर अनियमितता समोर आल्या.
जे. जे. महानगर रक्तपेढीमध्ये रक्तसंकलन आणि तपासणी प्रक्रियेत त्रुटी, गुणवत्ता नियंत्रणातील कमतरता तसेच अभिलेख व्यवस्थापनात गंभीर हलगर्जीपणा आढळून आला. याशिवाय औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम आणि संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचेही तपासात स्पष्ट झाले.
दरम्यान, माया ब्लड सेंटरमध्ये रक्तदान शिबिरांतून संकलित रक्ताच्या वाहतुकीच्या नोंदी अपूर्ण असल्याचे, उपकरणांचे प्रमाणीकरण कालबाह्य झाल्याचे, गुणवत्ता नियंत्रण चाचण्या नियमितपणे न झाल्याचे, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी असल्याचे तसेच रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मंजुरी आणि अभिलेख उपलब्ध नसल्याचे तपासणीत उघड झाले.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत FDA ने दोन्ही रक्तपेढ्यांतील रक्तसंकलन, रक्तघटक प्रक्रिया, परीक्षण, साठवणूक, वितरण, विक्री तसेच रक्तदान शिबिरांच्या आयोजनासह सर्व सेवा पुढील आदेशापर्यंत तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, रक्तासारख्या जीवनरक्षक घटकाच्या हाताळणीत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. रुग्णांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या आणि कायद्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.