ठाकरे गटाच्या आमदाराचा शिंदे गटाच्या मंत्र्यासोबत फोटो; सोशल मीडियावर राजकीय चर्चांना उधाण

    01-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई: राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या चर्चांनी वेग घेतला असतानाच ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील आणखी काही आमदार पक्षांतर करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शिंदे गटातील काही नेत्यांनी तर 'ऑपरेशन टायगर' सुरू असल्याचा दावाही केला आहे.

अशातच उमरगा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रताप सरनाईक यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. विधानभवन परिसरात काढलेला हा फोटो त्यांनी "परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्यासमवेत" अशा आशयाच्या कॅप्शनसह शेअर केला.

ही पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली. काहींनी "प्रवीण स्वामीही शिंदे गटात जाणार का?" असा प्रश्न उपस्थित केला, तर काहींनी मिश्कील प्रतिक्रिया देत पक्षांतराच्या चर्चांना आणखी हवा दिली.

मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील आमदार, मंत्री आणि नेते यांच्यात औपचारिक भेटीगाठी होणे ही सामान्य बाब मानली जाते. त्यामुळे केवळ एका फोटोवरून कोणत्याही राजकीय निर्णयाचा निष्कर्ष काढता येणार नाही. तरीही राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.