
Image Source:(Internet)
पुणे: राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास वेगाने सुरू असतानाच या प्रकरणाशी संबंधित पहिली मोठी प्रशासकीय कारवाई समोर आली आहे. केतन अग्रवालच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि असंवेदनशील पोस्ट शेअर करणाऱ्या डेंटिस्ट डॉ. मुस्कान सोनी हिला ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन (AIDSA) ने पाच वर्षांसाठी निलंबित करत ब्लॅकलिस्ट केले आहे.
माहितीनुसार, मध्य प्रदेशातील दंतचिकित्सक आणि AIDSA ची खजिनदार असलेल्या डॉ. मुस्कान सोनी यांनी केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर वादग्रस्त स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये त्यांनी केतनच्या मृत्यूवर हसण्याचे इमोजी वापरत टिप्पणी केली होती. तसेच, "खोटं बोलाल तर असंच होईल," अशा आशयाचे वक्तव्यही त्यांनी केले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या प्रकाराची गंभीर दखल घेत AIDSA ने तातडीने चौकशी करत डॉ. मुस्कान यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. संघटनेने जारी केलेल्या आदेशानुसार, पुढील पाच वर्षे त्यांना संस्थेच्या कोणत्याही पदावर काम करता येणार नाही. याशिवाय संस्थेच्या बैठका, परिषद, उपक्रम किंवा निवडणुकांमध्येही त्यांना सहभागी होता येणार नाही. या कालावधीत त्यांचे सदस्यत्वही प्रभावी राहणार नाही.
संघटनेने स्पष्ट केले की, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीकडून समाजाप्रती संवेदनशील व जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. एखाद्या मृत व्यक्तीची किंवा पीडित कुटुंबाच्या दुःखाची सार्वजनिकरित्या खिल्ली उडवणे हे वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिकतेला काळिमा फासणारे कृत्य आहे. त्यामुळे कठोर कारवाई करणे आवश्यक होते.
केतन अग्रवाल हत्या प्रकरण नेमकं काय?
पुण्यातील उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचे उघड झाले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी कट रचून केतनला किल्ल्यावरील उंच ठिकाणी नेले आणि दरीत ढकलल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा अपघात असल्याचे भासवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि इतर तपासातून पोलिसांनी हा संपूर्ण कट उघडकीस आणला.
पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. घटनेच्या चार दिवस आधीही सिया गोयलने त्याच किल्ल्यावर केतनला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. त्या प्रयत्नात ती अपयशी ठरली होती.
सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे पोलीस कोठडीत असून, त्यांच्या इतर साथीदारांचा तसेच राजस्थानमधील संपर्कांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.