महाराष्ट्रात हवामान विभागाचा इशारा, अनेक जिल्ह्यांत येत्या 100 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

    01-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून पुढील 100 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. 5 ते 7 जुलैदरम्यान राज्यातील बहुतांश भागांत चांगल्या पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांसाठी विविध स्तरांचे हवामान इशारे जारी करण्यात आले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी तसेच मच्छीमारांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात जोरदार सरी कोसळत आहेत. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारपर्यंत अधिक वेग घेतला असून पुढील दोन दिवसही मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, जून महिन्यात राज्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत सुमारे 47 टक्के पावसाची तूट राहिल्याने शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे घाटमाथा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यासाठी 2 जुलै रोजी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.