मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीजपुरवठा होणार!

    01-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर: महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणांची मालिका केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यामुळे रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून शेतीला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे. मात्र, चालू वर्षाच्या अखेरीस हा आकडा १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दिवसा ८ तास वीजपुरवठा केला जाईल आणि पुढे तो वाढवत सलग १२ तास वीज देण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतीचे आधुनिकीकरण हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगताना फडणवीस यांनी कृषी यांत्रिकीकरणासाठी देशात सर्वाधिक निधी महाराष्ट्राने उपलब्ध करून दिल्याचा दावा केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागाने देशातील पहिले कृषी आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ॲप विकसित केल्याची माहितीही त्यांनी दिली.

बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. आता बाजारात विक्री होणाऱ्या सर्व बियाण्यांचे सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रमाणित (सर्टिफाइड) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट बियाण्यांचा गैरव्यवहार रोखण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय, गेल्या काही वर्षांत राज्याने फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, पुढील काळात पशुपालन क्षेत्राचा विस्तार करून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील बदलत्या हवामानाचा विचार करून त्या भागासाठी स्वतंत्र कृषी धोरण विकसित करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.