
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : नीट-यूजी २०२६ च्या पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) यांनी सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर करणे आणि मूल्यांकन प्रक्रियेशी संबंधित तज्ज्ञांना परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा पार पडेपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन, लॅपटॉप, स्मार्टवॉचसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट आणि इतर संपर्क माध्यमांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
यावर्षी मे महिन्यात झालेल्या नीट-यूजी परीक्षेच्या कथित प्रश्नपत्रिका गळतीनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी एनटीएने सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या परीक्षेसाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी भारतीय वायुदलाच्या विमानांची मदत घेण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. देशातील विविध परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिका कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचाव्यात यासाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते.
याशिवाय सोशल मीडिया, मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन माध्यमांवर २४ तास नजर ठेवली जात असून, कोणतीही संशयास्पद माहिती किंवा हालचाल आढळल्यास तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, एनटीएने उमेदवारांसाठी परीक्षा शहराची माहिती देणारी पावती जारी केली आहे. ही पावती प्रवेशपत्र नसून परीक्षेचे शहर कळविण्यासाठी देण्यात आली आहे. अधिकृत प्रवेशपत्र लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एनटीएने दिली आहे.